
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत जळगाव शहर महानगरपालिका तर्फे ‘शास्ती माफी’ अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. वारंवार होत असलेल्या मागणीचा विचार करून ही योजना मर्यादित कालावधीसाठी लागू करण्यात आली असून ५ मार्च ते १९ मार्च २०२६ या कालावधीत नागरिकांना मालमत्ता करावरील शास्ती (दंड) पूर्णपणे माफ करून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

महापौर दीपमाला काळे यांनी या योजनेची माहिती देताना सांगितले की, नागरिकांना त्यांच्या थकीत करावरील दंडाची रक्कम न भरता केवळ मूळ कराची रक्कम भरून थकबाकीमुक्त होता येणार आहे. त्यामुळे नागरिकांवरील आर्थिक ताण कमी होणार असून महानगरपालिकेच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होईल.
या योजनेअंतर्गत नागरिकांनी दिलेल्या कालावधीत कर भरल्यास संपूर्ण शास्ती माफ करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने कर भरणा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विविध डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यात क्यूआर कोड स्कॅनिंग, नेट बँकिंग, डेबिट व क्रेडिट कार्ड, तसेच UPI ॲप्स जसे फोनपे, गुगल पे आदींचा समावेश आहे. नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीनेही कर भरणा करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या दृष्टीने ही योजना महसूल वाढीसाठी महत्त्वाची ठरणार असून शहराच्या विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्यास मदत होईल. थकबाकीचा बोजा कमी करण्याची आणि शहर विकासात आपला सहभाग नोंदविण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे महापौरांनी नमूद केले.
नागरिकांनी १५ दिवसांच्या या विशेष कालावधीत पुढाकार घेऊन आपली थकबाकी नियमित करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कर वेळेत भरल्यास भविष्यातील दंड आणि अडचणी टाळता येतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



