Home क्रीडा जळगावात ‘अस्मिता खेलो इंडिया’ स्पर्धेचे आयोजन

जळगावात ‘अस्मिता खेलो इंडिया’ स्पर्धेचे आयोजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगावात महिला आणि मुलींसाठी विशेष क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून ‘अस्मिता खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम रंगणार आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या वतीने, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत मेरा युवा भारत केंद्र, जळगाव आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

रविवार, ८ मार्च  रोजी सकाळी ८ वाजता एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. महाविद्यालय येथे या स्पर्धा पार पडणार आहेत. महिला व मुलींमध्ये क्रीडा संस्कार रुजवणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या क्षमतेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

स्पर्धांमध्ये १०० मीटर, २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या शर्यतींसह विविध मनोरंजक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. १३ वर्षांखालील, १३ ते १८ वर्षे आणि १८ वर्षांवरील अशा तीन स्वतंत्र वयोगटांमध्ये स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना पदके प्रदान करण्यात येणार असून विजेत्यांची नावे ‘ASMITA Khelo India’ उपक्रमांतर्गत मंत्रालयाकडे अहवाल स्वरूपात सादर केली जाणार आहेत.

सर्व सहभागी स्पर्धकांनी ‘अस्मिता खेलो इंडिया ’ पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. https://nsrs.kheloindia.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी. स्पर्धेच्या दिवशी सकाळी ७.३० वाजेपूर्वी उपस्थित राहून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि महिला संघटनांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त महिला व मुलींना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नोडल अधिकारी निलेश बाविस्कर (मो. ७७९८२१२१५९) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत केंद्र, जळगाव यांनी कळविले आहे.


Protected Content

Play sound