Home क्राईम मोठी बातमी : फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गांजा तस्करांना पकडले, ६३ किलो...

मोठी बातमी : फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गांजा तस्करांना पकडले, ६३ किलो गांजा जप्त


जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल ६३ किलो ७१० ग्रॅम गांजासह दोन अलिशान कार आणि ६ आरोपींना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत २२ लाख ७४ हजार २०० रुपये इतकी आहे. याप्रकरणी ६ जणांविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जळगावकडून पहूरच्या दिशेने एका इन्होव्हा कार क्रमांक (एमएच ०४ डीजे २०४२) मधून अंमली पदार्थांची तस्करी केली जाणार होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने आणि पहूर पोलिसांनी वाकोड गावाच्या पुढे सापळा रचला. संशयित कार दिसताच पोलिसांनी तिचा पाठलाग करून तिला ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलिसांनी सागर संजय इंगवले (नवी मुंबई), इरफान अक्रम शेख (मुंबई), आणि अमन ताज खान (मुंबई) यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, हा गांजा त्यांनी धुळे येथील नईम शेख याकूब, आबीद खान मेहमूद खान आणि तोहसिफ खान रसूल खान यांच्याकडून खरेदी केला होता. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली असून त्यांच्याकडील दुसरी मारुती रिट्झ कार क्रमांक (एमएच १८ डब्ल्यू २५२६) देखील जप्त केली आहे.

जप्त केलेला मुद्देमाल:
पोलीसांनी केलेल्या कारवाई १२ लाख ७४ हजार २०० रूपये किंमतीचा ६३ किलो ७१० ग्रॅम गांजा, ७ लाख रूपये किंमतीची इनोव्हा कार, ३ लाख रूपये किंमतीची मारूती कार असा एकुण २२ लाख ७४ हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते हे करीत आहे.


Protected Content

Play sound