मुंबई, वृत्तसेवा । गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चांना आता अधिकृतरीत्या पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण विधान करून विलीनीकरणाच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येतील, अशा चर्चांना उधाण आले होते. विशेषतः १२ फेब्रुवारी रोजी विलीनीकरणाची घोषणा होणार होती आणि पक्षाची सूत्रे अजित पवार यांच्याकडे सोपवली जाणार होती, असे दावे शरद पवार गटातील काही नेत्यांकडून करण्यात आले होते. मात्र, अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांनी यावर कधीही स्पष्ट भाष्य केले नव्हते.

या सर्व पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, विलीनीकरणाची प्रक्रिया आता पूर्णपणे थांबलेली आहे. ज्यांच्यासोबत ही बोलणी किंवा चर्चा सुरू होती, ते नेतृत्व आता आपल्यात नाही. त्यामुळे सद्यस्थितीत दोन पक्षांचे विलीनीकरण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
जयंत पाटील यांच्या या रोकठोक भूमिकेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना लगाम बसला आहे. अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेली भावनिक लाट आणि त्यातून विलीनीकरणाची व्यक्त केली जाणारी शक्यता आता धुसर झाली आहे. या विधानामुळे दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था संपली असून, आगामी काळात दोन्ही गट स्वतंत्रपणे आपली राजकीय वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात कोणती नवीन समीकरणे उदयाला येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे



