
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात होळीच्या उत्सवाचा आनंद ओसंडून वाहत असताना विवेकानंद नगर येथील नर्मदेश्वर महादेव मंदिरात भक्ती, रंग आणि संगीताचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.रोटरी क्लब ऑफ जळगाव रॉयलतर्फे येथे संगीतमय ‘राधा-कृष्ण देव होळी’ अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. फुलांची उधळण, सुमधुर भजने आणि आकर्षक सजावटीमुळे हा सोहळा विशेष ठरला.

कार्यक्रमासाठी राधा-कृष्णाची नयनरम्य व देखणी सजावट करण्यात आली होती. रंगीबेरंगी फुलांनी मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला होता. देवाप्रति कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी छप्पन भोग अर्पण करण्यात आला. फुलांच्या पाकळ्यांनी खेळली जाणारी ‘देव होळी’ हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. उपस्थित भाविकांनीही फुलांची उधळण करत भक्तिरंगात न्हाऊन निघाल्याचा अनुभव घेतला.
श्री सत्संग भजन मंडळ (बालाजी पेठ, रथ चौक) येथील कलाकारांनी सादर केलेल्या सुमधुर भजनांनी आणि पारंपरिक होळी गीतांनी कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणली. विश्वनाथ जोशी, सत्यनारायण तिवारी, गणेश दायमा, रामकुमार शास्त्री, निमिष शर्मा, विनोद त्रिपाठी यांसह कलाकारांच्या सादरीकरणाने वातावरण अधिकच भक्तिमय झाले. भजनांच्या तालावर भाविक मंत्रमुग्ध झाले होते. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विवेकानंद नगर परिसरातील अमर मित्र मंडळच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबचे अध्यक्ष जितू भोजवानी, सचिव गणेश वर्मा तसेच प्रमुख पदाधिकारी नारायण लाहोरी, भावेश शहा, वनिता वर्मा, कविता लाहोरी आणि वंचिका भोजवानी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या मंगल प्रसंगी परिसरातील अबालवृद्ध, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण मंदिर परिसर भक्ती, रंग आणि उत्साहाने उजळून निघाला होता. ‘देव होळी’च्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे होळी सणाला एक अध्यात्मिक आणि सांस्कृतिक आयाम लाभला.



