Home Cities यावल वर्डी येथे आदिवासी जनकल्याणाचा मेळावा; होळी उत्सवात मंत्री उईके यांची उपस्थिती

वर्डी येथे आदिवासी जनकल्याणाचा मेळावा; होळी उत्सवात मंत्री उईके यांची उपस्थिती


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील वर्डी येथे आयोजित ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’ व विविध विकास कार्यक्रमांचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते मंगळवार, दि. ३ मार्च २०२६ रोजी होणार आहे. यावेळी मंत्री उईके आदिवासी बांधवांच्या पारंपरिक होळी उत्सवातही सहभागी होणार असून आदिवासी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा संदेश दिला जाणार आहे.

मंत्री उईके सकाळी ७.३० वाजता शिरपूर येथून बोऱमळी (ता. चोपडा) येथे प्रस्थान करतील. सकाळी ९ वाजता बोऱमळी येथे आगमनानंतर ते पारंपरिक होळी उत्सवात सहभागी होतील. आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मता जपण्याच्या उद्देशाने हा सहभाग महत्त्वाचा मानला जात आहे.

दुपारी १२.३० वाजता वर्डी येथे आदिवासी विकास विभागातर्फे भव्य ‘आदिवासी विकास परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. परिषदेत शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती आदिवासी घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून विविध विकास कामांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून मंत्री उईके यांची त्यास भेट राहणार आहे.

परिषदेदरम्यान मंत्री उईके आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा व विकासविषयक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते, रोजगारनिर्मिती यांसारख्या मूलभूत विषयांवर शासनाच्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी अपेक्षित आहे.

दरम्यान, सकाळी ११.३० वाजता वर्डी येथे श्री समर्थ सुकनाथ बाबा संजीव समाधी मंदिर येथे पूजन कार्यक्रमास मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर त्यांच्या हस्ते आदिवासी विकास परिषदेचे औपचारिक उद्घाटन होईल.

या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील , जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार स्मिता वाघ, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound