Home क्राईम अवैध उत्खनन करणाऱ्यांना मोठा झटका; जळगावात 678 वाहनांवर कारवाई, 7 यंत्रे जप्त

अवैध उत्खनन करणाऱ्यांना मोठा झटका; जळगावात 678 वाहनांवर कारवाई, 7 यंत्रे जप्त


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने चालू आर्थिक वर्षात मोठी धडक कारवाई केली असून 678 वाहनांवर कारवाई करत तब्बल 10 कोटी रुपयांहून अधिक दंड आकारण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे अवैध वाळू व गौणखनिज माफियांना मोठा धक्का बसला आहे.

दि. 1 एप्रिल 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या 678 वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण रु. 10,00,26,778 इतका दंड आकारण्यात आला असून त्यापैकी रु. 6,99,71,250 इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. याशिवाय अवैध गौणखनिज प्रकरणी 59 गुन्हे दाखल करण्यात आले असून उत्खननासाठी वापरण्यात आलेली 7 यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे.

दि. 1 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत जिल्ह्यात एकूण 6818.27 ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला. त्यापैकी 4039 ब्रास वाळूचा नियमानुसार लिलाव करून शासनाला रु. 60,49,933 इतका महसूल प्राप्त झाला आहे. उर्वरित वाळूसाठा शासनाच्या नियमांनुसार घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सन 2025-26 मध्ये नोव्हेंबर-डिसेंबर 2025 दरम्यान पर्यावरणीय अनुमती प्राप्त 14 वाळूगटांसाठी ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापैकी 13 वाळूगटांचा यशस्वी लिलाव झाला असून 60,210 ब्रास वाळूसाठी रु. 4,79,95,730 इतका महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. यामुळे पारदर्शक पद्धतीने महसूल वाढीस चालना मिळाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तालुकास्तरीय तांत्रिक समितीकडून प्राप्त 17 वाळूगटांचे जिल्हा सर्वेक्षण अहवाल (DSR) प्रसिद्ध करण्यात आले असून खाणकाम आराखडा मंजुरीसाठी प्रकरण भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, नागपूर यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. मार्च 2026 मध्ये संबंधित 17 वाळूगटांचा ई-लिलाव प्रस्तावित आहे. तसेच नव्याने प्राप्त 96 वाळूगट प्रस्ताव पर्यावरणीय अनुमती प्रक्रियेसाठी सल्लागारांकडे पाठविण्यात आले आहेत.

दि. 8 एप्रिल 2025 च्या वाळू धोरणानुसार महसूल, पोलिस व परिवहन विभागांच्या समन्वयातून जिल्हास्तरीय वाळू नियंत्रण समितीची बैठक घेऊन प्रभावी उपाययोजनांच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात दक्षता पथके व गस्ती पथके स्थापन करून सातत्याने कारवाई सुरू ठेवण्यात येत आहे.

 


Protected Content

Play sound