Home Cities जळगाव जळगाव मनपाच्या ताफ्यात हायटेक यंत्रांची भर; स्वच्छता व अग्निशमन दल अधिक सक्षम

जळगाव मनपाच्या ताफ्यात हायटेक यंत्रांची भर; स्वच्छता व अग्निशमन दल अधिक सक्षम


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहराच्या स्वच्छता आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महानगरपालिकेच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या आधुनिक यंत्रसामग्रीचे लोकार्पण सोमवारी उत्साहात पार पडले. यात अग्निशमन विभागाचे दोन व आरोग्य विभागाच्या तीन जेसीबी वाहनांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करून महापौर दीपमाला काळे यांनी उद्घाटन केले.

जेसीबी लोकार्पण सोहळा आकाशवाणी चौकात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तीन नवीन जेसीबी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. या यंत्रांद्वारे महामार्गावरील कचरा ट्रॅक्टरमध्ये भरून साफसफाईच्या कामाला तात्काळ प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे महामार्ग दुतर्फा स्वच्छ आणि चकाकता ठेवण्याचा संकल्प महानगरपालिकेने केला आहे.

दरम्यान, महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यातही अत्याधुनिक वाहनांची भर घालण्यात आली. यापूर्वी सहा प्रभावी वाहने दाखल झाली होती, त्यात आता आणखी दोन हायटेक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. वॉटर ब्राऊजर या वाहनाची पाणी साठवण क्षमता तब्बल १२ हजार लिटर असून दोन सामान्य वाहनांइतके पाणी एकाच वाहनात साठवता येणार आहे. तसेच अ‍ॅडव्हान्स मल्टीपर्पज फाउंटन मशीनमुळे आपत्कालीन परिस्थितीत कमी वेळात आग विझविणे शक्य होणार आहे.

या सोहळ्यास भाजप गटनेता प्रकाश बालाणी, शिवसेना शिंदे गटाचे गटनेता विष्णू भंगाळे, शिवसेना ठाकरे गटाचे गटनेता इब्राहिम पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गटनेता प्रफुल्ल देवकर, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, सहाय्यक उपायुक्त उदय पाटील, अग्निशमन अधिकारी भारत बारी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी महापौर नितीन लढ्ढा आणि अनेक नगरसेवकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.


Protected Content

Play sound