
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महान कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा मराठी भाषा गौरव दिन गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मराठी भाषेचा अभिमान जपणे आणि तिचा प्रचार-प्रसार करणे हा या दिवसामागील उद्देश असून विद्यार्थ्यांनी विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांतून तो साकार केला.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी मराठी साहित्यविश्वातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करत अभिवादन केले.
कार्यक्रमादरम्यान कृष्णा राठोड, तेजस्विनी उगळे, ऋषिकेश पाटील आणि देवेंद्र पाटील या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आपल्या मनोगतातून प्रभावीपणे मांडले. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या अस्मितेची ओळख असल्याचे विद्यार्थ्यांनी अधोरेखित केले.
कवी सुरेश भट लिखित “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” हे गीत विद्यार्थी ऋषिकेश पाटील यांनी सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. तसेच “ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी अमुची” हे श्रीरंग गोडबोले लिखित गीत प्रथम वर्षातील विद्यार्थी चेतन चौधरी यांनी सुरेल आवाजात सादर करून वातावरण भारावून टाकले. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. कविता, लेख, नाटके, गीते लिहिण्यास प्रोत्साहन देत विविध साहित्यिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा सल्ला त्यांनी दिला. मातृभाषेचा अभिमान बाळगणे आणि ती जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन चौधरी यांनी केले, तर समन्वयक म्हणून ग्रंथपाल प्रा. नाकुल गाडगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.



