Home क्राईम हरताळा शिवारात पुन्हा बिबट्याची दहशत; वळू ठार, ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

हरताळा शिवारात पुन्हा बिबट्याची दहशत; वळू ठार, ग्रामस्थांत भीतीचे वातावरण


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील हरताळा शिवारात पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. जंगलालगत असलेल्या गट क्रमांक ६६ मधील शेतात घुसून बिबट्याने वळू फस्त केल्याने गावात व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक बालचंद्र धबाडे यांच्या मालकीच्या शेतात बांधलेल्या वळूवर रात्रीच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला चढवला. जोरदार आवाज ऐकून गस्तीस असलेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत वळूचा मृत्यू झाला होता. हल्ल्यानंतर बिबट्या जंगलाच्या दिशेने पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली. वनरक्षक दीपाली बेलदार यांनी घटनास्थळी पाहणी करून हा हल्ला बिबट्याचाच असल्याची खात्री केली. परिसरात बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

वनविभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले असून, रात्रीच्या वेळी जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, तसेच एकट्याने बाहेर पडू नये, असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काळे यांनी जिल्हा वनसंरक्षक राम धोत्रे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. वारंवार होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound