Home मनोरंजन चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या पूर्वसंध्येला विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या पूर्वसंध्येला विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात


नाशिक-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठी भाषा आणि संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित चौथे विश्व मराठी संमेलन २७ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयात रंगणार असून, त्याची पूर्वसंध्या आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील कवी कालिदास नाट्य मंदिर येथे सकाळी साडेआठ वाजता मराठी बोली महोत्सवाने या सोहळ्याची दिमाखदार सुरुवात झाली.

व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, संजीव सोनावणे, किरण कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, डॉ. मिलिंद जोशी, डॉ. सदानंद मोरे, डॉ. शामकांत देवरे, अॅड. नितीन ठाकरे आणि विश्वास ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उत्तम कांबळे यांचा तसेच नाशिकमधील विविध मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचेही यावेळी वाचन करण्यात आले.

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि मराठा विद्या प्रसारक संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी बोलींच्या वैविध्याचा उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.

जळगाव येथील परिवर्तन संस्थेने ‘अरे संसार संसार’ या बहिणाबाईंच्या गाणी व कवितांवर आधारित कार्यक्रमाचे प्रभावी सादरीकरण केले. हर्षल पाटील, शंभू पाटील आणि त्यांच्या चमूने सादर केलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. त्यानंतर बोहाडा मुखवटा नृत्याने लोकपरंपरेची झलक सादर केली.

अहिराणी गाण्यांवर खानदेशी अभिनेत्री पुष्पा ठाकूर, गायक भैय्या मोरे आणि विनोद कुमावत यांनी रंगतदार सादरीकरण करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. झाडीपट्टीतील विदर्भातील पारंपरिक नाट्यप्रकार नरेश गडेकर आणि त्यांच्या टीमने सादर करून लोककलेची समृद्ध परंपरा अधोरेखित केली. आराधी लोकनृत्य, लोकगीते आणि ‘जागर शिवबाचा’ यांसारख्या कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले. याशिवाय अभिनेते प्रशांत दामले यांच्या ‘अभिनेता शिकायला गेलो एक’ या नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन केले.

मराठी भाषा, साहित्य आणि लोकसंस्कृतीचा विविधतेने नटलेला हा महोत्सव नाशिककरांसाठी पर्वणी ठरत असून, आगामी तीन दिवस संमेलनात विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांची रेलचेल असणार आहे. मराठी भाषेचा जागतिक स्तरावर गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित या संमेलनाकडे राज्यभरातील साहित्यप्रेमींचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound