नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । विमान प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय जाहीर करत भारताच्या नागरी विमान वाहतूक नियामक संस्था Directorate General of Civil Aviation (DGCA) यांनी हवाई तिकीट रद्द व बदल नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. बुकिंगनंतर 48 तासांच्या आत तिकीट बदलल्यास किंवा रद्द केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, तसेच एअरलाईन्सना 14 दिवसांच्या आत रिफंड देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नव्या नियमांनुसार प्रवाशांना बुकिंगनंतर 48 तासांच्या आत ‘लुक-इन ऑप्शन’ अंतर्गत तिकीट मोफत बदलण्याची किंवा रद्द करण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय, बुकिंगनंतर 24 तासांच्या आत नावातील दुरुस्ती किंवा किरकोळ बदल एअरलाईन्सच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहेत. यामुळे प्रवाशांना प्रवास नियोजनात अधिक लवचिकता मिळणार आहे.

यापूर्वी तिकीट रिफंड प्रक्रियेत होणारा विलंब, अतिरिक्त शुल्क आणि एजंटमार्फत बुकिंग केल्यास निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर DGCA ने रिफंड नियम अधिक स्पष्ट आणि प्रवाशाभिमुख केले आहेत. वैद्यकीय कारणांमुळे तिकीट रद्द करण्याबाबतही नियम सुस्पष्ट करण्यात आले आहेत.
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ट्रॅव्हल एजंट किंवा ऑनलाइन पोर्टलमार्फत तिकीट खरेदी केले असले तरी रिफंड प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम जबाबदारी संबंधित एअरलाईन्सचीच राहणार आहे. एजंट हे एअरलाईन्सचे प्रतिनिधी म्हणून काम करत असल्याने प्रवाशांना रिफंडसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागणार नाहीत. यामुळे रिफंड प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.
या निर्णयामुळे एअरलाईन्सना रद्द/बदल शुल्कातून मिळणाऱ्या महसुलावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मात्र, ग्राहकांचा विश्वास वाढणे, पारदर्शकता आणि सेवा सुधारणा यामुळे दीर्घकालीन फायदा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेषतः सुट्ट्यांच्या आणि पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय हवाई प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.



