जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या शेगाव दौऱ्यादरम्यान आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळ्यात जळगाव येथील डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय आणि रिसर्च सेंटर यांनी सक्रिय सहभाग नोंदवत नागरिकांना आरोग्य सेवा प्रदान केली. या मेळ्यात महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी हजारो नागरिकांची तपासणी करून त्यांना आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैलीचे मार्गदर्शन केले.
शेगाव येथे अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन आणि आयुष मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच संत गजानन महाराज संस्थान यांच्या सहकार्याने २५ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान राष्ट्रीय आरोग्य मेळा आयोजित करण्यात आला आहे. या मेळ्याच्या माध्यमातून आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा आणि होमिओपॅथी या पारंपरिक उपचार पद्धतींचा प्रचार आणि प्रसार करण्यात येत असून नागरिकांना मोफत तपासणी, उपचार आणि औषधांचे वितरण केले जात आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्यासह राज्याचे राज्यपाल, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी राष्ट्रपतींनी भारतीय पारंपरिक औषध पद्धतींचे महत्त्व अधोरेखित करत औषधी वनस्पतींच्या संवर्धनावर भर देण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी औषधी वनस्पतींची लागवड वाढविल्यास त्यांना आर्थिक लाभ मिळण्याबरोबरच देशाच्या आरोग्य व्यवस्थेलाही मोठा फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले.
या आरोग्य मेळ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत नागरिकांची नाडी परीक्षण, आरोग्य तपासणी आणि विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारांची माहिती दिली. तसेच जीवनशैलीत आवश्यक बदल, आहाराचे महत्त्व आणि नैसर्गिक उपचार पद्धतींचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना पारंपरिक उपचार पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन संस्थेच्या सहभागाची माहिती दिली होती. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्यासाठी सेवा देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असून अशा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये सहभागी होणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय आरोग्य मेळ्याच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा, शेतकऱ्यांना औषधी शेतीचे मार्गदर्शन आणि आयुष उपचार पद्धतींबाबत जनजागृती केली जात आहे. या उपक्रमामुळे पारंपरिक भारतीय वैद्यकीय पद्धतींना नवे बळ मिळत असून नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होत आहे.



