Home राज्य राज्यात आता विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा अनिवार्य !

राज्यात आता विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा अनिवार्य !


मुंबई-वृत्तसेवा | महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी लागू असलेल्या ‘स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना’ संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक अपघात विमा अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच पुढील तीन वर्षांसाठी इन्शुरन्स ब्रोकर्स नोडल एजन्सीची निवड करण्यासही शासनाने मान्यता दिली आहे.

हा शासन निर्णय उपसचिव प्रताप पां. लुबाळ यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार जारी केला आहे. यापूर्वी ही योजना ऐच्छिक स्वरूपात होती. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आता ती अनिवार्य करण्यात आली आहे.

दरम्यान, ज्या विद्यापीठांकडे कमी हप्त्यात अधिक संरक्षण देणारी स्वतंत्र विमा योजना आधीपासून सुरू आहे, त्या विद्यापीठांना ती योजना कायम ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या संचालकांची पूर्वसंमती आवश्यक राहणार आहे.

या योजनेअंतर्गत असलेला वैद्यकीय विमा मात्र पूर्वीप्रमाणेच ऐच्छिक ठेवण्यात आला असून, विद्यार्थ्यांना तो घ्यायचा की नाही याचा निर्णय स्वतंत्रपणे घेता येणार आहे.

तसेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून पुढील तीन वर्षांसाठी इन्शुरन्स ब्रोकर्स नोडल एजन्सीची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या संदर्भातील पुढील कार्यवाही उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून करण्यात येणार असून, त्यांचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला जाणार आहे.


Protected Content

Play sound