दिल्ली प्रतिनिधी । क्रेडिट कार्डचे बिल थकल्याने येथील जगतपुरीमध्ये राहणाऱ्या तरुणाने आपल्या मुलीसह चार मजली इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास सुरेश कुमार (वय-35) याने आपल्या 4 वर्षांच्या मुलीसह राहत्या चार मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये सुरेशचा जागीच मृत्यू झाला असून, मुलीचे दोन्ही पाय अधू झाले आहेत. तसेच हा सर्व प्रकार पाहून सुरेशची पत्नी मनजीत कौर हिने देखील गच्चीवरून उडी मारली आणि तीसुद्धा जबर जखमी झाली आहे. त्याची पत्नी मनजीतने सांगितले की, सुरेश गुरुग्रामच्या एका खासगी कंपनीमध्ये काम करायचा. त्यामुळे त्याच्याकडे विविध बँकांचे क्रेडिट कार्ड होते. त्या क्रेडिट कार्डचे बिल जवळपास 8 लाख रुपये झाल्याने ही रक्कम परतफेड करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. तसेच बँकांकडून वारंवार कॉल व मॅसेज येत असल्यामुळे तो कंटाळून गेला होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिने सांगितले आहे.