मुंबई-वृत्तसेवा | महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागा रिक्त झाल्यामुळे लवकरच निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असून सर्वच पक्षांनी हालचालींना वेग दिला आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाने (भाजप) उमेदवार निश्चितीसाठी चर्चा अंतिम टप्प्यात आणली असून चार उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.
रामदास आठवले सध्या केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून कार्यरत असल्याने त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. उर्वरित तीन जागांसाठी मात्र पक्षांतर्गत चुरस वाढली आहे. संभाव्य उमेदवारांमध्ये विनोद तावडे, विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक कामात सक्रिय असलेले विनोद तावडे यांना संधी मिळाल्यास त्यांचा सक्रिय संसदीय राजकारणात पुनरागमन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भाजप चार जागांवर उमेदवार देणार असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना प्रत्येकी एक उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्याने बारामती पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांचे नाव राज्यसभेसाठी पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी २६ फेब्रुवारी रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे.
महाविकास आघाडीतील एका जागेवर काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी दावा केल्याने आघाडीत अंतर्गत रस्सीखेच सुरू झाली आहे. या जागेच्या अंतिम निर्णयाची गुरुकिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात असल्याचे मानले जाते.
सध्याच्या राजकीय गणितानुसार राज्यसभेच्या सात जागांपैकी भाजपचे चार, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे प्रत्येकी एक आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उमेदवारांची अधिकृत घोषणा आणि राजकीय हालचालींना आणखी वेग येणार आहे.



