मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मराठी चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा यंदा अत्यंत दिमाखात पार पडला. ‘मराठी गाजलंच पाहिजे’ या प्रभावी थीमवर रंगलेल्या या सोहळ्यात मराठी संस्कृतीचा ठसा, परंपरेचा अभिमान आणि आधुनिकतेची सुंदर सांगड अनुभवायला मिळाली. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात दोन मराठी चित्रपटांनी विशेष छाप सोडत अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आणि प्रेक्षकांसह समीक्षकांचीही दाद मिळवली.
गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करत विविध श्रेणींतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये दशावतार आणि आता थांबायचं नाय या दोन चित्रपटांनी अक्षरशः डंका वाजवला. ‘ब्लॉकबस्टर सिनेमा ऑफ द इयर’ हा मानाचा पुरस्कार ‘दशावतार’ने पटकावला, तर ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’चा किताब ‘आता थांबायचं नाय’ने आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही या दोन चित्रपटांतील कलाकारांमध्ये विभागून देण्यात आला.

‘दशावतार’चे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला, तर ‘आता थांबायचं नाय’मधील भरत जाधव यांनीही हा सन्मान मिळवला. ‘आता थांबायचं नाय’ने एकूण चार पुरस्कार जिंकत आपली ताकद सिद्ध केली, तर ‘दशावतार’ने तीन महत्त्वाचे पुरस्कार पटकावत यशाची नोंद केली. सहाय्यक भूमिकेसाठी सिद्धार्थ जाधव यांना गौरवण्यात आले.
दिग्दर्शन क्षेत्रात ‘आता थांबायचं नाय’साठी शिवराज वायचळ यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. अभिनेत्री विभागात अमृता सुभाष यांनी ‘जारण’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान पटकावला. पदार्पण श्रेणीत संतोष डावखर यांना ‘गोंधळ’साठी दिग्दर्शनाचा पुरस्कार, नंदिनी चिकटे (‘स्थळ’) आणि साजिरी जोशी (‘एप्रिल मे ९९’) यांना सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कार, तर तारानाथ खिरटकर (‘स्थळ’) यांना सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. अनुरूप जोडी म्हणून ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे यांची निवड करण्यात आली.
विशेष म्हणजे ‘दशावतार’ला झी5 वरील सर्वाधिक पाहिला गेलेला सिनेमा (मराठी Z5 वरील सर्वाधिक पाहिलेली मूळ मालिका)हा मानही मिळाला. त्यामुळे बॉक्स ऑफिससोबतच डिजिटल प्लॅटफॉर्मवरही या चित्रपटाने आपली लोकप्रियता सिद्ध केली. संपूर्ण मंचावर मराठीचा आवाज घुमत होता आणि प्रत्येक पुरस्कारावेळी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत होता.
यंदाचा सोहळा हा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम न ठरता मराठी कलेचा आणि संस्कृतीचा उत्सव ठरला. ‘मराठी गाजलंच पाहिजे’ हा संदेश अधिक ठामपणे देत या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. मराठी चित्रपटसृष्टीच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा विश्वास या सोहळ्याने पुन्हा अधोरेखित केला. हा भव्य सोहळा प्रेक्षकांना 14 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता Zee Marathi वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.



