जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज भाजपच्या आगामी कार्यकाळासाठी नवीन प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली आहे. या नवीन कार्यकारिणीत जळगाव जिल्ह्याला मोठे स्थान देण्यात आले असून, उत्तर महाराष्ट्र विभागासाठी जिल्ह्यातील दोन महत्त्वपूर्ण नेत्यांना प्रदेश चिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये चाळीसगावचे धडाडीचे आ.मंगेश चव्हाण आणि भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा भैरवी वाघ-पलांडे यांचा समावेश आहे.
उत्तर महाराष्ट्राच्या संघटनेला बळ :
भारतीय जनता पार्टीने आगामी निवडणुका आणि पक्ष बांधणीच्या दृष्टीने ही नवी टीम तयार केली आहे. जळगाव जिल्ह्यातून आमदार मंगेश चव्हाण यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या आक्रमक कार्यशैलीने आणि संघटन कौशल्याने पक्षात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत पक्षाने त्यांना आता प्रदेशस्तरावर चिटणीस म्हणून संधी दिली आहे.

दुसरीकडे, खासदार स्मिताताई वाघ यांच्या कन्या भैरवी वाघ-पलांडे ह्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्य उपाध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम करत आहे. तरुण पिढीमध्ये त्यांची असलेली पकड आणि महिला संघटन या बाबी लक्षात घेऊन त्यांना मुख्य कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. या दोन्ही नियुक्त्यांमुळे उत्तर महाराष्ट्रात, विशेषतः जळगाव जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
नेत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव :
या निवडीची घोषणा होताच जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे तसेच जिल्ह्यातील सर्व भाजप आमदारांनी या दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
“आ. मंगेश चव्हाण आणि भैरवी वाघ-पलांडे यांच्या निवडीमुळे जळगाव जिल्ह्याचा आवाज प्रदेश पातळीवर अधिक सक्षमपणे पोहोचेल. त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला आगामी काळात नक्कीच होईल,” अशा भावना ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. या नियुक्त्यांनंतर जिल्ह्याच्या विविध भागांत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



