Home Cities अमळनेर पाडळसे निम्न तापी प्रकल्पाला ‘अजितदादा पवार’ यांचे नाव द्या – आ. अनिल...

पाडळसे निम्न तापी प्रकल्पाला ‘अजितदादा पवार’ यांचे नाव द्या – आ. अनिल पाटील 


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी राज्य शासनाकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना अधिकृत विनंतीपत्र सादर केले असून, प्रकल्पाच्या उभारणीत अजितदादा पवार यांच्या पाठपुराव्याचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले आहे.

आमदार अनिल भाईदास पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच जलसंपदा मंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, निम्न तापी प्रकल्प पाडळसे हा तापी नदीवरील अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून तो पूर्ण झाल्यानंतर अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील सुमारे ४३ हजार ६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पांतर्गत १७.१ टीएमसी पाणी अडविण्याचे नियोजन असून शेती, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वापरासाठीही मोठा दिलासा मिळणार आहे.

पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, या प्रकल्पाला गती देण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे डिसेंबर २०२४ मध्ये मंत्रिमंडळ बैठकीत ४ हजार ८९० कोटी रुपयांची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य शासनाने दिली. त्यानंतर हा प्रकल्प मान्यतेसाठी केंद्रीय जलआयोग कडे पाठविण्यात आला. आवश्यक वैधानिक मान्यता, राज्याचा हिस्सा देण्याची हमी आणि राज्य वित्त आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर केंद्रीय जलआयोगाने प्रकल्पाची शिफारस करून तो केंद्रीय जलशक्ती मंत्रालय कडे पाठविला.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने विशेष अधिकार समितीची मान्यता घेत या प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना अंतर्गत केला. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे जलपूजन अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र त्यांच्या निधनामुळे ते शक्य झाले नाही. तरीही त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करीत असल्याने त्यांच्या कार्याची आठवण म्हणून या प्रकल्पाला ‘अजितदादा पवार निम्न तापी प्रकल्प पाडळसे, ता. अमळनेर, जि. जळगाव’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी केली आहे.


Protected Content

Play sound