जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील पोलीस कॉलनी परिसरात मागील अनेक वर्षांपासून सांडपाणी निचऱ्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्थानिक रहिवाशांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे. गटारीचे तातडीने बांधकाम करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
पोलीस कॉलनी परिसरात गेल्या सुमारे पंधरा वर्षांपासून सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत असून यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांडपाण्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ नुसार प्रत्येक नागरिकाला सन्मानाने आणि आरोग्यदायी वातावरणात जगण्याचा अधिकार आहे. मात्र गटारीअभावी परिसरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून मलेरिया, डेंग्यू यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण झाला असून प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
पोलीस कॉलनीतील रहिवासी नियमितपणे महानगरपालिकेचे सर्व कर भरत असूनही त्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नागरिकांकडून कराच्या माध्यमातून जमा होणारा निधी हा त्यांच्या सोयीसुविधांसाठी वापरणे अपेक्षित असताना अशा मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तात्काळ परिसराची पाहणी करून सांडपाणी निचऱ्याच्या समस्येचे वस्तुनिष्ठ परीक्षण करावे आणि नवीन गटारीच्या बांधकामास तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन ते निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कामाच्या प्रगतीबाबत नागरिकांना लेखी स्वरूपात माहिती देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, शहराध्यक्ष विनोद शिंदे, शहराध्यक्ष किरण तळले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, चेतन पवार, विभाग अध्यक्ष राहुल चव्हाण, दीपक राठोड, खुशाल ठाकूर, शाखाध्यक्ष युसुफ खाटीक तसेच महाराष्ट्र सैनिक शरीफ पिंजारी, जहांगीर पेंटर, इसाक अफजल खाटीक आणि पोलीस कॉलनीतील नागरिक यावेळी उपस्थित होते.



