जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत आज लोकप्रतिनिधींचा प्रचंड संताप पाहायला मिळाला. केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि खा. स्मिताताई वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेत कामात दिरंगाई करणाऱ्या आणि प्रोटोकॉल पाळण्यात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. विशेषतः महावितरण आणि रेल्वे विभागाच्या कारभारावर यावेळी ताशेरे ओढण्यात आले.
महावितरणच्या प्रोटोकॉल उल्लंघनावर मंत्र्यांचा संताप :
बैठकीत केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत असताना, महावितरण विभागाचा एक गंभीर प्रकार समोर आला. केंद्राच्या योजनांमध्ये ६० टक्के निधी केंद्र सरकारचा असतानाही, स्थानिक स्तरावर केंद्रीय मंत्री आणि खासदारांना अंधारात ठेवून एका आमदाराच्या मुलीच्या हस्ते उद्घाटन उरकले गेल्याचे समोर आले. यावर मंत्री रक्षाताई खडसे कमालीच्या संतापल्या. “केंद्राचा पैसा असताना मंत्र्यांना डावलून उद्घाटनं कशी होतात? तुम्हाला प्रोटोकॉलचा विसर पडला आहे का?” असा सडेतोड सवाल करत त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना भर बैठकीत झापले.

रेल्वे अभियंत्यांची घेतली झाडाझडती :
दुसरीकडे, वरणगाव येथील रेल्वे पुलाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या विलंबाबाबत रेल्वे अभियंत्यांनी दिलेली उत्तरे मंत्र्यांच्या पचनी पडली नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने रक्षा खडसे यांनी रेल्वे अभियंत्यांना धारेवर धरले. “एवढ्या छोट्या कामाला इतका विलंब का लागतोय? तुम्ही काय दुसऱ्या देशात जाऊन तपासणी करताय का?” अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण न झाल्यास गंभीर परिणाम भोगण्याचे संकेतही त्यांनी दिले.
प्रशासकीय यंत्रणा हादरली :
या बैठकीला जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, महापौर दिपमाला काळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. मंत्री आणि खासदारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे नियोजन भवनातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. विकासकामांत कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा लोकप्रतिनिधींचा अनादर खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी दिशा समितीकडून देण्यात आला.



