अडावद (ता. चोपडा)-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अडावद ता. चोपडा येथील उनपदेव येथे आदिवासी बांधवांच्या पारंपरिक भोंगऱ्या बाजाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला. गुलाल उधळीत, श्रीफळ वाढवीत आणि भोंगऱ्या देवाचे विधिवत पूजन करत या पारंपरिक बाजाराचे आमंत्रण देण्यात आले. पुढील आठवडाभर विविध गावांमध्ये भोंगऱ्या बाजार भरणार असल्याने परिसरात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे.
२३ तारखेला सकाळी १० वाजता उनपदेव येथील शरभंग ऋषी पाड्यावर, ज्या ठिकाणी दरवर्षी भोंगऱ्या बाजार भरतो त्या जागेवर भोंगऱ्यादेवाची स्थापना करण्यात आली. पुजारी भाया पावरा यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. पूजा संपल्यानंतर उपस्थित आदिवासी बांधवांवर गुलाल उधळून ‘गुलाल्या’ साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात हा सोहळा पार पडला.

भोंगऱ्या बाजार हा आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग मानला जातो. या बाजाराच्या निमित्ताने विविध गावांतील बांधव एकत्र येतात, देवपूजन करतात आणि पारंपरिक देव-धर्म, रूढी-परंपरांचे जतन करतात. श्रीफळ वाढवून बाजाराचे औपचारिक आमंत्रण देण्याची परंपरा यंदाही पाळण्यात आली. यामुळे पुढील आठवड्यात परिसरातील विविध गावांमध्ये भोंगऱ्या बाजाराची रेलचेल पाहायला मिळणार आहे.
या कार्यक्रमास पोलीस पाटील देवसिंग पावरा, पुजारी भाया पावरा, आदिवासी समाजसेवक संजीव शिरसाठ, विकासोचे माजी चेअरमन सचिन महाजन, वसंतराव देशमुख पतपेढीचे माजी चेअरमन मनोहर पाटील, पी. आर. माळी, जितेंद्रकुमार शिंपी, रफिक मण्यार, रायसिंग पावरा, रमेश बारेला, गजाराम पावरा, खुमसिंग पावरा, गाठ्या बारेला, दिलीप बारेला, वनगावचे मधु भिल, शेवरे बु. येथील पोलीस पाटील गणदास बारेला, तसेच भायसी बारेला, मंगला बारेला, आमली बारेला, समरा बारेला, गुड्डी बारेला, अंबीबाई बारेला, दुर्गाबाई बारेला, वाकडीबाई बारेला, सुकलाल बारेला, भागीराम बारेला, सागर पावरा, रतन पावरा, प्रताप बारेला, गेलसिंग बारेला, जगन महाराज यांच्यासह अनेक आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



