लंडन वृत्तसंस्था । इंग्लंडच्या ट्वेंटी-20 क्रिकेट इतिहासात सर्वात कमी धावसंख्येची नोंद शुक्रवारी झाली. सरे आणि ग्लॅमोर्गन संघाच्या या लढतीत ग्लॅमोर्गनचा संपूर्ण संघ अवघ्या 44 धावांत माघारी परतला आहे. दरम्यान सामना सुरु असताना मैदानावर लांडग्यानं धाव घेतल्यानं सर्वांची पळापळ झाली.
प्रथम फलंदाजी करताना सरेचा संपूर्ण संघ 141 धावांत तंबूत परतला. सरेच्या डब्ल्यू जॅक्सने सर्वाधिक 40 धावा केल्या. ग्लॅमोर्गन संघाकडून ए सॅल्टर आणि एम लँग यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. 141 धावांचा पाठलाग करतान ग्लॅमोर्गनला दुसऱ्याच षटकात जबरदस्त धक्के बसले. टॉम कुरनने तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट्स घेत हॅटट्रिक साजरी केली. या धक्कातून सावरण्यापूर्वीच इम्रान ताहिर आणि जी बॅटी यांनी ग्लॅमोर्गनचा डाव गुंडाळला. या तीनही गोलंदाजांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेत 12.5 षटकांत ग्लॅमोर्गनचा संपूर्ण संघ 44 धावांत माघारी पाठवला. पाकिस्तानचा सलामीवीर फाखर जमानने ग्लॅमोर्गनकडून सर्वाधिक 17 धावा केल्या. याआधी हा नकोसा विक्रम नॉर्दन सीसीनं (सर्वबाद 47) डुर्हम क्रिकेट संघाविरुद्ध 2011साली नोंदवला होता. इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघातील सदस्य असलेल्या टॉम कुरनने हॅटट्रिक नोंदवून सरेच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यानं 2 षटकांत 3 धावांत 3 विकेट्स घेतल्या.