पहूर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर गावातील ताज ऑटोच्या मागील भागात अवैध रित्या गॅस सिलेंडर्सचा साठा करणाऱ्या एकावर पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली आहे. पोलीसांनी केलेल्या कारवाईत ३० हजाराहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पहूर गावातील ताज ऑटो दुकानाच्या मागील भागात घरगुती गॅसचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याची गोपनिय माहिती पहूर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत संशयित आरोपी शेख वजीर शेख गुलाब वय ३४ रा. पहूर याच्याजवळून ३० हजार रूपये किमतीचे साहित्य व मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. याबाबत पुरवठा निरीक्षक प्रदीप दनुसिंग आडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेख वजीर शेख गुलाब (वय ३४, रा. खाजा नगर, पहूर) याच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते हे करीत आहे.




