जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सावखेडा गावात दुकानासमोर भांडण करू नका सांगणाऱ्या दुकानदाराला एकाने शिवीगाळी करत चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शनीवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याबाबत सायंकाळी ६ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील सावखेडा गावात नथ्थु शामराव सोनवणे वय ६७ हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. किराणा दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान, गावात राहणारा चेतन रविंद्र बोरसे आणि जंगळे मोतीराम सुर्यवंशी यांचे नथ्थू सोनवणे यांच्या दुकानासमोर शनीवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता भांडण सुरू होते. त्यावेळी नथ्थू सोनवणे यांनी दुकानासमोर भांडण करू नका असे सांगितले. या रागातून चेतन बोरसे याने शिवीगाळ करत सोनवणे यांच्या हातावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. यानंतर त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी संशयित आरोपी चेतन बोरसे यांच्यावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ धनराज पाटील हे करीत आहे.




