सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या सहकार भारतीच्या सदस्य नोंदणी अभियानात सहकारी संस्था व सहकार क्षेत्रातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहकार भारतीचे राष्ट्रीय सहकार प्रमुख तथा इफको संस्थेचे संचालक राजदत्त पांडे यांनी केले. न्हावी येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
सहकार भारती ही संघटना राष्ट्रीय स्तरावर सहकार चळवळीच्या बळकटीसाठी व्यापक काम करत असून तिचे सभासदत्व सर्वांसाठी खुले आहे. सहकार क्षेत्रातील विविध संस्था, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी संघटनेच्या सदस्य नोंदणी अभियानात सहभागी होऊन सहकार चळवळ अधिक मजबूत करावी, असे पांडे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सहकार क्षेत्रातील पारदर्शकता, संघटनात्मक शिस्त आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यावर विशेष भर दिला.

जळगाव जिल्हा सहकार भारती व यावल तालुका कार्यकर्ता सभा जे. टी. महाजन फ्रुटसेल सोसायटीच्या सभागृहात राष्ट्रीय मंत्री दिलीप रामू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यक्रमाच्या प्रारंभी जे. टी. महाजन यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. सभेचे प्रास्ताविक व स्वागतपर मनोगत फ्रुटसेल सोसायटीचे चेअरमन शरद महाजन यांनी मांडले.
सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी न्हावी गाव हे जिल्ह्यातील सहकाराचे ऊर्जा स्थान व प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. त्यांनी जिल्ह्यातील सहकार भारतीच्या कार्याचा आढावा घेत स्व. दादासाहेब जे. टी. महाजन यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या समर्पित कार्याचा गौरव केला. त्यांच्या कार्यातून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात दिलीप पाटील यांनी सहकार चळवळीची निर्दोष व मजबूत वाढ व्हावी यासाठी सहकार भारती सातत्याने प्रयत्नशील असल्याचे नमूद केले. संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्व संस्था व व्यक्तींनी सभासद होऊन सक्रिय सहभाग नोंदवावा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
एफपीओचे राज्य प्रमुख अमृतकर यांनी केळी विपणनासाठी कोल्ड स्टोरेज उभारणी अत्यावश्यक असल्याचे सांगितले. एफपीओच्या माध्यमातून सहकारी संस्थांनी पुढाकार घेऊन केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. शेतकरी व उत्पादकांना बाजारपेठेत योग्य दर मिळण्यासाठी साठवणूक सुविधा उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महामंत्री शशिकांत बेहडे यांनी केले. सभेस सहकार भारतीचे पदाधिकारी संध्या देशमुख, प्रमोद नगरकर, जयदीप शहा, अनिता वाणी, मनीषा आवारे, नारायण भुसारी, तालुका अध्यक्ष महेश गडे, व्ही. का. चेअरमन प्रवीण वारके, मल्टी सोसायटी चेअरमन भानुदास चोपडे, दूध संस्था प्रतिनिधी पराग वाघूलडे, उमेश बेंडाळे, सागर फिरके, रवींद्र फिरके, चंद्रशेखर चौधरी, किरण चौधरी, काशिनाथ वारके, सुजय महाजन, सुभाष भंगाळे, भोजराज बोरोळे यांच्यासह फ्रुटसेल सोसायटी, व्ही. का. सोसायटी व दूध सोसायटीचे संचालक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी धनंजय फिरके, नितीन चौधरी, हर्षद महाजन आणि गोटू फिरके यांनी परिश्रम घेतले.



