Home क्राईम चाळीसगाव कोर्ट परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगाव कोर्ट परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील न्यायालय परिसरात भरदिवसा एका वकिलावर लोखंडी सुरी आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना २० फेब्रुवारी रोजी दुपारी २:४५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण न्यायालय परिसरात आणि शहरात मोठी खळबळ उडाली असून, वकील वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायणवाडी येथील रहिवासी असलेले वकील समीर अफजल शेख (वय ४५) हे शुक्रवारी नेहमीप्रमाणे न्यायालयात आपले कामकाज करत होते. यावेळी संशयित आरोपी नाज उर्फ माज आरीफ खाटीक याने त्यांना फोन करून त्यांच्या स्थानाबद्दल विचारणा केली. शेख यांनी आपण कोर्टात असल्याचे सांगताच, काही वेळातच आरोपी आरीफ रहेमतुल्ला खाटीक, दानीश आरीफ खाटीक आणि नाज उर्फ माज आरीफ खाटीक (सर्व रा. हिरापूर रोड, चाळीसगाव) हे हातात धारदार शस्त्रे घेऊन त्या ठिकाणी पोहोचले.

फिर्यादी समीर शेख यांनी दिलेल्या जबाबानुसार, आरोपी आरीफ खाटीक याने “आज याला संपवून टाका” असे चिथावणीखोर वक्तव्य केले. त्यानंतर दानीश खाटीक याने सुरीने त्यांच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेख यांनी स्वतःचा बचाव केल्याने ते थोडक्यात वाचले. त्याच वेळी नाज उर्फ माज खाटीक याने कोयत्याने डोक्यावर वार केला. हा वार अडवण्यासाठी शेख यांनी आपला डावा हात डोक्यावर धरला असता, कोयता हाताच्या बोटांना लागून ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी शहरातील बापजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक तपासात हा हल्ला प्लॉट खरेदी-विक्रीच्या जुन्या वादातून झाला असल्याचे समोर आले आहे. या गंभीर घटनेची दखल घेत चाळीसगाव शहर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०९, ११५(२), ४९, ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर करत आहेत. न्यायालयीन परिसरातच अशा प्रकारे हल्ला झाल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


Protected Content

Play sound