पुणे-वृत्तसेवा । राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःचे सलून सुरू केल्याच्या कारणावरून मालकाने मित्रांच्या मदतीने तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव मोहम्मद शमी (वय २५, रा. अप्पर जुना बसस्टॉप, बिबवेवाडी, मूळ रा. प्रयागराज, उत्तरप्रदेश) असे आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ मोहम्मद सलमान फिरोज कुरेशी (वय १८) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून सौरभ चोरगे, अनिकेत सराटे आणि रोहित बालशंकर या तिघांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शमी हा गेल्या दोन वर्षांपासून आरोपी सौरभ चोरगे याच्या सलूनमध्ये काम करत होता. काही दिवसांपूर्वी शमीने चोरगे याला गावाला जात असल्याचे सांगितले होते. मात्र, तो गावाला न जाता त्याने स्वतःचे सलून सुरू केले. त्यानंतर शमी हा चोरगेच्या सलूनमधील ग्राहकांना स्वतःच्या दुकानात बोलावत असल्याचे चोरगेच्या लक्षात आले.
यामुळे संतप्त झालेल्या चोरगेने आपल्या दोन मित्रांसह शमीकडे जाऊन त्याला जाब विचारला. या वेळी दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि तिघांनी मिळून शमीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर मारहाणीत शमी बेशुद्ध पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, किरकोळ कारणावरून तरुणाचा जीव घेतल्याच्या या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



