जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात अत्याधुनिक नवीन जिल्हा न्यायालय उभारण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई शुक्रवारी (२० फेब्रुवारी) मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने केली. शाहू नगरातील ट्राफिक गार्डन परिसरातील सात एकर जागा मोकळी करण्यात आली असून या कारवाईदरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जिल्हा न्यायालयाची सध्याची जागा अपुरी पडत असल्यामुळे न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी शाहू नगर परिसरातील ट्राफिक गार्डनलगतची सुमारे सात एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. या जागेवर अनेक खाद्यपदार्थ विक्रेते, हातगाडी चालक तसेच गॅरेज व्यवसायिकांनी अतिक्रमण करून आपला व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे न्यायालयाच्या कामासाठी आवश्यक असलेली जागा अडथळ्यात आली होती.

दरम्यान, संबंधित जागा जिल्हा न्यायालय प्रशासनाने अधिकृतपणे ताब्यात घेतली असून येथे कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये, अशा सूचना देणारे फलक देखील लावण्यात आले होते. असे असतानाही काही हॉकर्स आणि व्यावसायिकांनी पुन्हा अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले. यामुळे न्यायालय प्रशासनाने कठोर भूमिका घेत अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला.
शुक्रवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने अधीक्षक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत संबंधित जागेवरील सर्व अतिक्रमण हटवून परिसर मोकळा केला. यावेळी काही अतिक्रमणधारकांनी कारवाईला विरोध करत पथकासोबत हुज्जत घातली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस आणि मनपा प्रशासनाच्या समन्वयातून अखेर कारवाई पूर्ण करण्यात आली. यात आठ गाड्या व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.
नवीन जिल्हा न्यायालयाच्या उभारणीसाठी जागा मोकळी करणे आवश्यक असल्याने प्रशासनाने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. भविष्यात या ठिकाणी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज न्यायालयाची इमारत उभारली जाणार असून त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या कामकाजाला गती मिळणार आहे.



