भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील नॅशनल हायवेवर हॉटेल तवक्कलसमोर एक भीषण अपघात झाल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी घडली आहे. या अपघातात एका ५० वर्षीय सायकलस्वार व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी बुधवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत रमेश भिका तायडे (वय ५०, रा. न्यू आंबेडकर नगर, भुसावळ) हे आपल्या सायकलने नॅशनल हायवेवरून जात असताना, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव युनिकॉर्न दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. (एमएच १९ एजी ७३३६) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष दिल्याने अपघात झाला. या अपघातात रमेश तायडे हे सायकलवरून रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला, पाठीला आणि डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक अर्चना अहिरे करत आहेत.




