Home Cities जळगाव अनुभव घेऊन ज्ञानार्जन कधीही उत्तम – डॉ. केतकी पाटील

अनुभव घेऊन ज्ञानार्जन कधीही उत्तम – डॉ. केतकी पाटील


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । युवा शक्तीला अनुभवाच्या माध्यमातून घडविण्याच्या उद्देशाने आयोजित आंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रमाचा शुभारंभ उत्साहात झाला. “अनुभव घेऊन ज्ञानार्जन कधीही उत्तम” असे प्रतिपादन डॉ. केतकी पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.

मेरा भारत जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम १८ ते २२ फेब्रुवारीदरम्यान पार पडत आहे. युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत असून प्रा. सुजानी व प्रा. प्रणाली यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील सुमारे ४० युवक-युवती सहभागी झाले आहेत.

कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी मंचावर डॉ. केतकी पाटील, जिल्हा युवक अधिकारी अभिषेक चौरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. व्ही. एम. रोकडे उपस्थित होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रास्ताविकात अभिषेक चौरे यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व विशद करताना शहरी व ग्रामीण भागातील युवकांमध्ये वैचारिक व सांस्कृतिक आदान-प्रदान घडवून आणण्याचा हेतू स्पष्ट केला. मार्गदर्शन करताना डॉ. केतकी पाटील यांनी बहिणाबाई चौधरींचे उदाहरण देत सांगितले की, औपचारिक शिक्षण नसतानाही त्यांनी जीवनातील अनुभवातून अमूल्य साहित्यनिर्मिती केली. युवकांनीही अनुभवातून शिकण्याची वृत्ती जोपासावी आणि ग्रामीण संस्कृती समजून घेण्यासाठी अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आणि डॉ. व्ही. एम. रोकडे यांनीही युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सहभागी युवकांना शूज, ट्रॅकसूट व पाण्याची बाटली असलेली किट मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. युवकांनीही आपल्या भावना व्यक्त करत या संधीबद्दल समाधान व्यक्त केले.

या उपक्रमांतर्गत सहभागी युवक जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणांना भेट देणार असून ग्रामीण जीवनशैली, सण-उत्सव, खाद्यसंस्कृती, ऐतिहासिक स्थळे व ग्रामपंचायतींचे कार्य यांची माहिती जाणून घेणार आहेत. या माध्यमातून शहर-ग्रामीण भागातील संवाद वाढून सामाजिक सलोखा अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound