यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात चोरी आणि घरफोडीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, विरार नगर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख साबिर शेख प्यारेसाहब (वय ३४, रा. विरार नगर, यावल) हे बुरुज चौकात ‘बऱ्हाणपूर जिलेबी सेंटर’ चालवून आपला उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी मदिना नगरमधील आपला एक प्लॉट शेख वसीम यांना विक्री केला होता. या व्यवहारातून मिळालेले ३ लाख रुपये आणि व्यवसायातील इतर अडीच लाख रुपये अशी एकूण ५.५० लाखांची रोकड त्यांनी घरातील लोखंडी कपाटात सुरक्षित ठेवली होती.

१६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेख साबिर हे आपल्या कुटुंबासह बऱ्हाणपूर येथे आई-वडिलांना भेटण्यासाठी गेले होते. घर पूर्णपणे कुलूपबंद असताना चोरट्यांनी या संधीचा फायदा घेतला. १७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जेव्हा कुटुंब परतले, तेव्हा त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले.
घरात प्रवेश करताच कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरट्यांनी कपाटाचे लॉकर अत्यंत चलाखीने तोडून त्यातील ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि ३८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील दागिने लंपास केले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.



