जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील मुख्य बाजारपेठेत वाढलेल्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी महापालिकेने बुधवारी सकाळी धडक कारवाई करत सुभाष चौक आणि जुन्या कापड बाजार परिसरातून तब्बल २० हातगाड्या जप्त केल्या. या अचानक झालेल्या कारवाईमुळे अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून महापालिकेने अतिक्रमणाविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुभाष चौक आणि जुना कापड बाजार हा परिसर जळगाव शहरातील सर्वाधिक वर्दळीचा आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा भाग मानला जातो. या भागात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, ग्राहक आणि वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र अनेक विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला आणि काही ठिकाणी रस्त्यावरच हातगाड्या उभ्या केल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते. परिणामी पादचाऱ्यांना चालताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता, तसेच वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली होती.

ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनातर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम उपायुक्त पंकज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिक्रमण निर्मूलन अधिकारी संजय ठाकूर यांच्या आदेशानुसार सकाळी आठ वाजेपासून विशेष पथकाने मोहिमेला सुरुवात केली. या पथकात नाना कोळी, संजय हरी पाटील, नितीन भालेराव, शेखर ठाकूर आणि संजय परदेशी यांचा समावेश होता.
पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने परिसराची पाहणी करत अनधिकृतपणे उभ्या केलेल्या आणि रस्त्यावर सोडून दिलेल्या एकूण २० हातगाड्या जप्त केल्या. महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरातील अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे शहराचा चेहरामोहरा सुधारण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी यापुढेही विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या अतिक्रमणविरोधी मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.



