Home राजकीय राज ठाकरे–एकनाथ शिंदे भेटीने राजकारणात खळबळ ; चर्चांना उधाण

राज ठाकरे–एकनाथ शिंदे भेटीने राजकारणात खळबळ ; चर्चांना उधाण


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री व शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची नंदनवन बंगल्यावर जाऊन भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली असली तरी ही भेट राजकीय स्वरूपाची होती की केवळ सदिच्छा भेट होती, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाल व पुष्पगुच्छ देत राज ठाकरे यांचे स्वागत केले. त्यानंतर बंद दाराआड दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचे शिंदेसेनेकडून सांगण्यात आले आहे. मात्र चर्चेचे नेमके मुद्दे आणि राजकीय संदर्भ याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

गेल्या महिन्यात मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी एकत्र लढत दिली होती. त्यांच्या विरोधात भाजप आणि शिंदेसेनेची महायुती मैदानात उतरली होती. निवडणूक प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली होती, त्यामुळे दोन्ही पक्षांतील राजकीय दुरावा स्पष्ट दिसून आला होता.

तथापि, निवडणुका आटोपल्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेने शिंदेसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने राजकीय समीकरणांमध्ये बदलाची चिन्हे दिसू लागली. स्वतः राज ठाकरे यांनीही भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत लवचिकता दाखवण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर आजची भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

एकीकडे ठाकरे बंधूंची युती पुढेही कायम राहील, असा दावा करण्यात येत असताना दुसरीकडे शिंदेसेनेशी वाढती जवळीक दिसत असल्याने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची पुढील भूमिका काय असेल, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. या भेटीमुळे आगामी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, शिंदेसेनेकडून या भेटीत विविध विकासकामे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न आणि राज्यातील राजकीय परिस्थिती यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अधिकृत निवेदन येईपर्यंत या भेटीचा नेमका राजकीय अर्थ लावणे अवघड असल्याचे जाणकारांचे मत आहे.


Protected Content

Play sound