मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | संत मुक्ताई यांच्या यात्रोत्सवानंतर परंपरेनुसार आईसाहेबांचा क्षीणभाग दूर करण्यासाठी गुरुवार, दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी श्रीक्षेत्र कोथळी येथील श्री संत मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळ, मूळ मंदिरात प्रक्षाळ पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता या विशेष पूजेला सुरुवात होणार असून औषधी काढ्याने महाअभिषेक केला जाणार आहे.
दि.११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या यात्रोत्सवात राज्यभरातून लाखो भाविकांनी उपस्थित राहून आईसाहेबांचे दर्शन घेतले. या काळात मंदिर सलग २४ तास खुले ठेवण्यात आले होते. भाविकांच्या अखंड दर्शनामुळे आईसाहेबांना मानवी देहाप्रमाणे थकवा येतो, अशी भक्तांची श्रद्धा असून हा क्षीणभाग दूर करण्यासाठी यात्रेनंतर प्रक्षाळ पूजा करण्याची प्राचीन परंपरा येथे जपली जाते.

या पूजेदरम्यान प्रथम मंदिराचा गाभारा आणि परिसराची स्वच्छता सेवा केली जाते. त्यानंतर विविध आयुर्वेदिक वनस्पतींपासून तयार केलेल्या औषधी काढ्याने आईसाहेबांच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो. तसेच मूर्तीला साखर आणि लिंबू लावून स्वच्छ करण्यात येते. या प्रक्रियेनंतर आरती करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येतो. या पूजेला विशेष धार्मिक आणि भावनिक महत्त्व असल्याने भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात.
या महापूजेत आणि स्वच्छता सेवेत सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री संत मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळाचे अध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांनी विश्वस्त मंडळाच्या वतीने केले आहे.



