मुंबई-वृत्तसेवा | देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ रिक्त होणाऱ्या जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली असून, महाराष्ट्रातील सर्वाधिक ७ जागांसाठी येत्या १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार आहे. एप्रिल २०२६ मध्ये अनेक दिग्गज सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक राज्याच्या राजकारणात महत्त्वाची आणि चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ मार्च आहे, तर ६ मार्च रोजी अर्जांची छाननी होणार आहे. ९ मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दिली असून १६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान पार पडेल. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या शरद पवार, डॉ. भागवत कराड, रामदास आठवले, प्रियंका चतुर्वेदी, रजनी पाटील, डॉ. फौजिया खान आणि धैर्यशील पाटील या सात खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी संपणार आहे. त्यामुळे या सात जागांसाठी होणारी निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
राज्य विधानसभेचे प्रभावी संख्याबळ सध्या २८६ असून एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी ३७ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे भाजपचे १३१, शिंदे गटाच्या शिवसेनेचे ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ४० असे मिळून २२८ आमदार आहेत. तसेच सात अपक्ष व लहान पक्षीय आमदारांचा पाठिंबा धरल्यास हे संख्याबळ २३५ पर्यंत पोहोचते. या बळावर महायुतीचे किमान सहा उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजप चार जागा, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबातील घडामोडींमुळे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी उमेदवारी प्रक्रियेपूर्वी राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे संकेत आहेत.
दुसरीकडे, विरोधी महाविकास आघाडीसमोर संख्याबळाचे आव्हान आहे. शरद पवार गटाचे १०, काँग्रेसचे १६ आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेचे २० असे मिळून ४६ आमदार आहेत. माकप व शेकापचे प्रत्येकी एक आमदार धरून ही संख्या ४८ होते. या संख्याबळावर मविआचा एक उमेदवार निश्चित विजयी होऊ शकतो, मात्र दुसऱ्या जागेसाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करणे कठीण मानले जात आहे. त्यामुळे मविआकडून एकच उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता अधिक आहे.
महाराष्ट्रासह ओडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्येही राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत उमेदवारी अर्ज प्रक्रियेमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार असून महायुती आणि मविआकडून कोणाला उमेदवारी दिली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
एकूणच, राज्यातील संख्याबळाच्या गणितानुसार महायुतीचा या निवडणुकीत स्पष्ट वरचष्मा दिसत असला, तरी मविआकडून एक जागा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाणार असून राज्यसभेची ही निवडणूक राजकीय समीकरणे बदलणारी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



