चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील कृष्णापूर येथे एका ४७ वर्षीय महिलेचा आपल्या राहत्या घरी विजेचा जोरदार धक्का लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून कृष्णापूर गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत चोपडा तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अक्काबाई भास्कर बारेला (वय ४७, रा. कृष्णापूर, ता. चोपडा, जि. जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. आपल्या राहत्या घरी दैनंदिन कामे करत असताना त्यांना अचानक विजेचा भीषण धक्का लागला. या घटनेत त्या गंभीररित्या भाजल्या गेल्या आणि जागीच कोसळल्या. नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना ‘मृत घोषित’ केले. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक बापू साळुंके हे पुढील तपास करत आहेत.




