Home मनोरंजन सलीम खान रुग्णालयात दाखल ; सलमानचा तणावग्रस्त व्हिडिओ व्हायरल

सलीम खान रुग्णालयात दाखल ; सलमानचा तणावग्रस्त व्हिडिओ व्हायरल


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । बॉलिवूडमधून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पटकथालेखक आणि ज्येष्ठ निर्माते सलीम खान यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सलीम खान यांना नेमक्या कोणत्या कारणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, त्यांचा मुलगा आणि बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आज सकाळी रुग्णालयाबाहेर दिसला. सध्या तो त्याच्या आगामी ‘Battle of Galwan’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र, वडिलांच्या प्रकृतीची बातमी समजताच तो तातडीने रुग्णालयात दाखल झाल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाबाहेर कडक सुरक्षेतून बाहेर पडतानाचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान करून रुग्णालयातून बाहेर पडताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे जाणवत असून माध्यमांशी संवाद न साधता तो थेट गाडीत बसून निघून गेला. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये अभिनेता व निर्माता अतुल अग्निहोत्री देखील लीलावती हॉस्पिटल येथे जाताना दिसत आहेत.

९० वर्षीय सलीम खान हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज लेखकांपैकी एक मानले जातात. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये ते समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षारक्षकांसोबत फेरफटका मारताना दिसत होते. त्या वेळी त्यांच्या प्रकृतीत काहीशी अशक्तपणा जाणवत असल्याची चर्चा रंगली होती. आता अचानक त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

खान कुटुंबाकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. चाहत्यांकडून मात्र सलीम खान यांच्या लवकर बरे होण्यासाठी सोशल मीडियावर प्रार्थना आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. पापाराझींनी रुग्णालयाबाहेरील हालचालींचे फोटो आणि व्हिडिओ कैद केले असून ते मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत.


Protected Content

Play sound