जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्वच्छतेचा प्रश्न आणि रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी महापौर दीपमाला काळे सध्या आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. मंगळवारी, १७ फेब्रुवारी रोजी सकाळी महापौरांनी जुन्या टीबी हॉस्पिटल परिसरातील घंटागाडी केंद्राला अचानक भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी केवळ पाहणीच केली नाही, तर थेट कर्मचाऱ्यांशी संवाद साधून ग्राऊंड झिरोवरील वास्तव जाणून घेतले.
कर्मचाऱ्यांनी मांडल्या गंभीर व्यथा :
महापौरांशी बोलताना कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढाच वाचला. “वाहनांमध्ये डिझेल नेहमी कमी असते, कंत्राटदार वेळेवर उपस्थित नसतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे पगार वेळेवर मिळत नाहीत,” अशा तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या. धक्कादायक बाब म्हणजे, कामकाजादरम्यान लागणारा दंड देखील कर्मचाऱ्यांच्या पगारातूनच कापला जातो, अशी माहिती समोर आली आहे. जळगाव शहरातील काही भागांत घंटागाडी वेळेवर का पोहोचत नाही, या प्रश्नावर कर्मचाऱ्यांनी तांत्रिक अडचणींकडे लक्ष वेधले. कचरा खाली करण्यासाठी कॉम्पॅक्टर यंत्राकडे गेल्यावर तिथे मोठी रांग असते. वाहन रिकामे व्हायला वेळ लागल्यामुळे नियोजित कॉलनीमध्ये पोहोचण्यास उशीर होतो, असे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.

यावेळी वाहनांच्या उपलब्धतेबाबतची माहितीही समोर आली. शहरात सध्या ८३ जुन्या आणि २१ नवीन अशा एकूण १०४ घंटागाड्या आहेत, त्यापैकी ८८ गाड्या प्रत्यक्ष कार्यरत आहेत. तर १६ गाड्या ब्रेक डाऊन स्थितीत आहेत. ७ जुने आणि ६ नवीन असे एकूण १३ कॉम्पॅक्टर असून त्यातील ८ सध्या सुरू आहेत. याशिवाय ९ पिकअप, ६ डम्पर आणि ३ स्किप लोडर अशी यंत्रणा शहरात तैनात आहे.
महापौरांचा कडक इशारा :
या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी बीव्हीजी कंपनीचे प्रोजेक्ट हेड विनोद रेड्डी यांना प्रत्यक्ष बोलावून कामाचा जाब विचारला. “शहरातील कचरा निर्मूलन वेळेवर आणि शिस्तबद्ध पद्धतीने झालेच पाहिजे. जर कामात सुधारणा झाली नाही, तर कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल,” असा कडक इशारा महापौरांनी दिला. तसेच, स्वच्छता यंत्रणेत शिस्त आणण्यासाठी प्रसंगी कठोर पावले उचलण्याचे संकेतही त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.



