Home Cities जळगाव सांडपाणी जोडणी करा, तलाव वाचवा; महापौरांचे नागरिकांना आवाहन

सांडपाणी जोडणी करा, तलाव वाचवा; महापौरांचे नागरिकांना आवाहन


जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि त्याचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने आता कंबर कसली आहे. अमृत मलनिस्सारण योजनेचे काम पूर्ण झालेल्या भागातील नागरिकांनी आपल्या घरगुती सांडपाण्याची जोडणी तातडीने मलवाहिनीला (सीवरेज लाईन) करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तलावात थेट मिसळणारे सांडपाणी थांबवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अमृत मलनिस्सारण योजनेअंतर्गत झोन क्रमांक १ आणि झोन क्रमांक ४ मधील कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने नेहरूनगर, नूतन वर्षा कॉलनी, आदर्श नगर आणि जीवन मोती सोसायटी या परिसरांचा समावेश आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी नैसर्गिक नाल्यांद्वारे मेहरूण तलावात जात असल्याने तलावाच्या जलप्रदूषणात मोठी वाढ होत होती. आता या भागात मलनिस्सारण व्यवस्था कार्यान्वित झाल्याने प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.

महानगरपालिकेने नागरिकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, घरातील सांडपाणी थेट उघड्या नाल्यात किंवा तलावाच्या दिशेने न सोडता ते मुख्य मलवाहिनीला जोडावे. ही जोडणी करताना अधिकृत प्लंबरचाच वापर करावा आणि ती योग्य तांत्रिक पद्धतीने होईल याची खात्री करावी. चुकीच्या पद्धतीने केलेली जोडणी भविष्यात संपूर्ण मलनिस्सारण व्यवस्थेसाठी अडथळा ठरू शकते, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

मलवाहिनी जोडणी करताना नागरिकांना काही तांत्रिक अडचणी आल्यास त्यांनी संबंधित प्रभागातील लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा. तसेच, अधिक माहिती किंवा मार्गदर्शनासाठी महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाशी (९ वा मजला) संपर्क साधण्याचे आवाहन महापौर दिपमाला काळे यांनी केले आहे. मेहरूण तलाव हे शहराचे नैसर्गिक संचित असून त्याचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound