यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथील श्री महादेव हनुमान मंदिरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात महापूजा, फराळ वाटप आणि विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान महादेवांचे दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतला.
महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात महादेवाची विधिवत महापूजा मुरलीधर अंकुश पाटील यांनी पत्नीसह तसेच चार विवाहित महिलांच्या हस्ते पार पडली. यावेळी पुजारी म्हणून गिरी गोसावी यांनी धार्मिक विधी संपन्न केले. या निमित्ताने सुमारे पाच क्विंटल साबुदाणा फराळ, केळी आणि साखरेचे वाटप भाविकांना करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून गावातील व्यापारी जगदीश वासुदेव पाटील आणि जगदीश गायकवाड हे फराळ वाटपासाठी उदार हस्ते आर्थिक योगदान देत असून, यंदाही त्यांनी ही परंपरा कायम राखली. दिवसभर मंदिर परिसरात भावगीतांचा कार्यक्रम झाला, तर रात्री आध्यात्मिक कार्यक्रमाने वातावरण अधिकच भक्तिमय झाले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त बाळकृष्ण पाटील, उपसरपंच देविदास पाटील, प्रमोद चौधरी, हेमा न्हावी, रमेश टेलर, शैलेंद्र पाटील आणि अरुण अत्तरदे यांनी मार्गदर्शन केले. तसेच विजय लोहार, प्रभाकर राऊत, रवींद्र पाटील, भिका पाटील, गोकुळ पाटील, बाळू पाटील, पिंटू पाटील, बाळू धनगर, भैय्या तेली, देवाजी पाटील, किरण पवार, सागर आनंदा पाटील आणि कांदा व्यापारी किशोर वासुदेव पाटील यांच्या कामगारांनी विशेष परिश्रम घेतले.
याशिवाय किशोर वासुदेव पाटील यांच्या गड कांदे कामगार संघटनेने तसेच बाळू पोलाद पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवारानेही मोलाचे सहकार्य केले. गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.



