Home Cities जळगाव भाजपाकडून हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा ; शिवाजी महाराजांवरील वक्तव्याचा तीव्र निषेध

भाजपाकडून हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा ; शिवाजी महाराजांवरील वक्तव्याचा तीव्र निषेध


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने जळगाव शहरात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या आंदोलनामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदविला.

रविवार, 15 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता भाजपच्या जुने वसंत स्मृती कार्यालयापासून या प्रतिकात्मक अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. तिरडीवर हर्षवर्धन सपकाळ यांचा पुतळा ठेवून शहरातून मिरवणूक काढण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी हे वक्तव्य तमाम हिंदू व राष्ट्रप्रेमी बांधवांचा अपमान असल्याचा आरोप करत निषेध व्यक्त केला.

या तिरडीला आग्या देण्याचे कार्य महेश चौधरी यांनी केले. आमदार सुरेश भोळे (राजू मामा), जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महापौर दिपमाला काळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, राजेंद्र मराठे, आनंद सपकाळे, मनोज भांडारकर, मुकुंद मेटकर, चंदू महाले, अजित राणे, निलू आबा तायडे, विनोद मराठे, प्रकाश पंडित आदी पदाधिकाऱ्यांनी तिरडीला खांदा दिला.

टॉवर चौकात अंत्ययात्रा पोहोचल्यानंतर महिला कार्यकर्त्यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. मंगलाताई बारी आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतीकात्मक शोक व्यक्त करत घोषणाबाजी केली. यावेळी भाजपचे सर्व नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, युवा मोर्चा आणि महिला आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान संबंधित वक्तव्याचा निषेध करत काँग्रेस पक्षाने तात्काळ भूमिका स्पष्ट करावी आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडले असले तरी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली.


Protected Content

Play sound