Home प्रशासन रावेर तालुका भाजपचे तीव्र आंदोलन ; हर्षवर्धन सकपाळ यांच्या विधानाचा निषेध

रावेर तालुका भाजपचे तीव्र आंदोलन ; हर्षवर्धन सकपाळ यांच्या विधानाचा निषेध


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या विधानाच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन छेडण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून त्यांना समकक्ष ठरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जबरदस्तीने धर्मांध राजवटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टिपू सुलतानशी करणे हा इतिहासाचा अपमान असून महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट घाला असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले. सकपाळ यांच्या वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून रावेर तालुक्यातही त्याचे तीव्र पडसाद उमटले. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत संबंधित विधानाचा निषेध करण्यात आला.

भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या कार्याची तुलना इतर कोणत्याही शासकाशी करणे अयोग्य आणि आक्षेपार्ह आहे. या विधानाबद्दल केवळ माफी मागून चालणार नाही, तर काँग्रेस पक्षाने तात्काळ कारवाई करून हर्षवर्धन सकपाळ यांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली. अशा व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही आंदोलनकर्त्यांनी ठामपणे नमूद केले.

या आंदोलनात नगरसेवक पद्माकर महाजन, अमोल पाटील, दिलीप पाटील, विजय महाजन (अजनाड), भाजपा अध्यक्ष रवी पाटील, दुर्गादास पाटील, उमाकांत महाजन, पी. के. महाजन, सी. एस. पाटील, संजय महाजन, राजू सुवर्णे, जगदीश पाटील, योगेश महाजन, पवन चौधरी, बाळा आमोदकर, शुभम लासुरकर, चेतन पाटील आदी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलन शांततेत पार पडले असले तरी सकपाळ यांच्या वक्तव्याबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली. आगामी काळातही याविरोधात आवाज उठवण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.


Protected Content

Play sound