मुंबई-वृत्तसेवा | सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेला सध्या पूर्णविराम देत हा विषय पक्षाच्या प्राधान्यक्रमात नसल्याचे स्पष्ट केले आहे. विलीनीकरणाची चर्चा आज, उद्या किंवा काही महिन्यांनीही करता येईल, त्यामुळे त्यासाठी घाई करण्याची कोणतीही गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, “रोज विलीनीकरण, विलीनीकरण ही काय चर्चा आहे? एवढा मोठा निर्णय दोन्ही बाजूंच्या नेत्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल. आजच तो झाला पाहिजे, असे म्हणण्यात काही अर्थ नाही.”

दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदी नियुक्त झालेल्या सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व स्थिर करणे हेच सध्या पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. “सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्षपदी १०० टक्के निवडल्या जाणार आहेत. नवीन कॅप्टन आले आहेत. त्यांना काम करू द्या, परिस्थिती समजून घेऊ द्या. त्यानंतर पुढील निर्णय घेतले जातील,” असे ते म्हणाले.
उल्लेखनीय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. शरद पवार यांच्या गटाने विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याचा दावा केला होता, मात्र अजित पवार गटाने हा दावा फेटाळून लावला आहे.
भुजबळ यांनी यासंदर्भातील संभाव्य प्रस्तावाबाबत विचारलेल्या प्रश्नावर “अशा काल्पनिक प्रश्नांना उत्तर देण्यात अर्थ नाही,” असे स्पष्ट सांगितले.
दरम्यान, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विभागातील कथित लाचखोरी प्रकरणावरही भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. “हे प्रकरण पोलिसांकडे गेले आहे. चौकशीत सत्य बाहेर येईल. झिरवाळ यांनी स्वतःच दोषी ठरल्यास राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सध्या त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही,” असे ते म्हणाले.
यावेळी झिरवाळ यांनी नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांची भेट घेतल्याबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
एकूणच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलानंतर स्थिरता निर्माण करणे हेच सध्या पक्षाचे मुख्य लक्ष्य असून विलीनीकरणाचा निर्णय पुढील काळात चर्चेनंतरच घेतला जाईल, असे संकेत भुजबळ यांच्या वक्तव्यातून मिळाले आहेत.



