Home प्रशासन धोकादायक कागदी कपांचा वापर वाढला; यावलमध्ये अन्न व औषध प्रशासनाची निष्क्रियता चर्चेत

धोकादायक कागदी कपांचा वापर वाढला; यावलमध्ये अन्न व औषध प्रशासनाची निष्क्रियता चर्चेत


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरासह संपूर्ण तालुक्यात हॉटेल्स आणि चहा स्टॉलवर मानवी आरोग्यास धोकादायक ठरू शकणाऱ्या कागदी कपांमध्ये चहाची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजारास कारणीभूत ठरू शकणाऱ्या रसायनांचा वापर असलेल्या या कपांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित यंत्रणांच्या निष्क्रियतेबाबत सर्वसामान्यांत संताप व्यक्त होत आहे.

शहरात आणि तालुक्यातील अनेक भागांमध्ये चहाच्या हॉटेल्स व स्टॉलवर ग्राहकांना सर्रास कागदी कपांमध्ये चहा दिला जात आहे. या कपांच्या आतील भागावर मायक्रो प्लास्टिकचा थर असतो. गरम चहा ओतल्यावर या थरातील सूक्ष्म प्लास्टिक कण वितळून चहात मिसळतात आणि ते थेट शरीरात जातात. तज्ज्ञांच्या मते, ‘बिस्फेनॉल ए’ सारखी रसायने या कपांच्या निर्मितीत वापरली जातात. ही रसायने दीर्घकाळ शरीरात गेल्यास हार्मोनल बिघाड, पचनसंस्थेचे विकार तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

शासनाने अशा प्रकारच्या धोकादायक कागदी कपांच्या वापरावर निर्बंध घातले असल्याचे सांगितले जाते. तरीदेखील यावल शहरात आणि ग्रामीण भागात या कपांचा वापर उघडपणे सुरू असल्याने प्रशासनाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अन्न व औषध प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. संबंधित विभागाने तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, काही ग्राहकांनी पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पर्यायांचा वापर करण्याची गरज व्यक्त केली आहे. मातीचे कुल्हड, स्टीलचे ग्लास किंवा पुनर्वापर करता येणारी भांडी यांचा वापर केल्यास आरोग्याचा धोका टाळता येऊ शकतो, असेही मत व्यक्त होत आहे. मात्र स्वस्त आणि सोयीस्कर पर्याय म्हणून कागदी कपांचा वाढता वापर चिंताजनक ठरत आहे.

एकीकडे आरोग्यविषयक जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जात असताना, दुसरीकडे दैनंदिन वापरातील अशा वस्तूंमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करून नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound