मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | “जासी तरी जायसी संताचिया गावा, होईल विसावा तेणें जीवा…” या संतवचनांची प्रचिती सध्या मुक्ताईनगरीत अनुभवायला मिळत आहे. आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या मुक्ताईनगर येथे गुरु-शिष्य भेटीचा पारंपरिक यात्रोत्सव भक्तिभावाने साजरा होत असून, संपूर्ण परिसर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या घोषात न्हाऊन निघाला आहे.
या यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे आदिशक्ती संत मुक्ताबाई आणि योगी चांगदेव महाराज यांच्यातील गुरु-शिष्य नात्याचे प्रतीक असलेली भेट. माघ वद्य महाशिवरात्रीला चांगदेव महाराजांनी पुणतांब्याला समाधी घेतली होती. त्या स्मरणार्थ दरवर्षी ही वारी आयोजित केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी मुक्ताईंच्या पादुका पालखी सोहळ्यासह चांगदेव भेटीसाठी निघतात. हा सोहळा म्हणजे गुरु-शिष्य परंपरेचा भावनिक आणि अध्यात्मिक संगम मानला जातो. या वेळी हजारो वारकरी डोळ्यांत भक्ती आणि हृदयात श्रद्धा घेऊन या दिव्य क्षणाचे साक्षीदार होतात.

विजया एकादशीच्या मंगल पर्वावर केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या सुकन्या कुमारी कृषीका खडसे यांच्या हस्ते जुन्या मुक्ताई मंदिरात विधीवत पूजा व अभिषेक करण्यात आला. राजकारणापलीकडे जाऊन संस्कृतीची परंपरा पुढील पिढीच्या हाती सोपवण्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. धार्मिक परंपरा आणि आधुनिक नेतृत्व यांचा सुंदर संगम यावेळी पाहायला मिळाला.
यात्रोत्सवात ‘नर सेवा हीच नारायण सेवा’ या उक्तीची प्रचिती देणारे अनेक उपक्रम राबवण्यात आले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी वारकरी व भाविकांना फराळाचे वाटप केले तसेच स्वतः गळ्यात टाळ घेऊन भजनात सहभाग घेतला. मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीच्या ‘सेवेकरी फॉर्म्युला’मुळे दर्शनबारी, चहा-पाणी, चप्पल स्टँड आदी सुविधा शिस्तबद्ध पद्धतीने उभारण्यात आल्या. लाखो भाविकांची उपस्थिती असूनही नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे यात्रोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडत आहे.
यात्रोत्सवात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योगमाया प्रतिष्ठान, सारा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विठ्ठल मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या या शिबिरात तपासणी, औषधोपचार आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अध्यात्मासोबतच आरोग्याची जपणूक करण्याचा हा उपक्रम वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.
विदर्भ, मराठवाडा, खान्देश तसेच मध्य प्रदेशातून आलेल्या शेकडो दिंड्यांनी नवीन मुक्ताई मंदिर परिसरात मुक्काम केला आहे. अखंड हरिनामाच्या जागरणाने आणि कीर्तन-भजनांच्या स्वरांनी आसमंत भारावून गेला आहे.
खऱ्या अर्थाने, मुक्ताई-चांगदेव गुरु-शिष्य भेटीचा हा सोहळा म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर संस्कार, परंपरा आणि अध्यात्माचा जिवंत वारसा आहे. भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा त्रिवेणी संगम अनुभवण्यासाठी मुक्ताईनगर सध्या भाविकांनी गजबजून गेले आहे.



