अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील न्यू प्लॉट परिसरात ७५ ते ८० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भाडेकरू कुटुंबाचे घर जेसीबीच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे पाडल्याप्रकरणी शहरातील नामांकित बिल्डर सरजू गोकलानी यांच्यासह पाच ते सहा जणांविरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, न्यू प्लॉट भागातील देशमुख चाळ, टी.पी. क्रमांक ४५/०१ येथे शरद जाधवराव शिंदे यांचे दोन खोल्यांचे लोखंडी पत्र्याचे भाड्याचे घर आहे. सदर घराचे वीज व नळ कनेक्शन शिंदे यांच्या नावावर असून त्यांच्या कुटुंबाचा सुमारे ७५ ते ८० वर्षांपासून त्या ठिकाणी रहिवास आहे.

दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजेच्या सुमारास, शिंदे यांची कोणतीही संमती न घेता सरजू गोकलानी यांच्या सांगण्यावरून चार ते पाच इसम व महेश देशमुख (रा. अमळनेर) यांनी घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने संपूर्ण घर जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान घरातील लोखंडी गोदरेज कपाट, लोखंडी रॅक, स्टील रॅक, स्टीलची गॅस शेगडी, कुलर, दोन पंखे आदी अंदाजे २० हजार रुपयांच्या साहित्याचे नुकसान करण्यात आले. तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याचाही आरोप आहे.
याप्रकरणी शरद शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरजू गोकलानी, त्यांचे चार ते पाच सहकारी व महेश देशमुख यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३२९(३), ३२९(४), ३२४(४), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत. घटनेमुळे शहरात चर्चेला उधाण आले असून पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



