Home क्रीडा टी20 वर्ल्डकप 2026 ; इटलीचा नेपाळवर 10 विकेट्सनी विजय, इंग्लंड चौथ्या स्थानावर...

टी20 वर्ल्डकप 2026 ; इटलीचा नेपाळवर 10 विकेट्सनी विजय, इंग्लंड चौथ्या स्थानावर घसरले


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या क गटात अनपेक्षित घडामोडी घडताना दिसत असून इटलीने नेपाळवर 10 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवत गुणतालिकेत मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. या निकालाचा थेट फटका इंग्लंडला बसला असून बलाढ्य समजल्या जाणाऱ्या इंग्लंडची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.

टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात अनेकदा मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघांनी बलाढ्य संघांना धक्का दिल्याची उदाहरणे याआधीही घडली आहेत. यंदाच्या स्पर्धेतही क गटात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. नेपाळने पहिल्या सामन्यात इंग्लंडला चांगलीच झुंज दिली होती. इंग्लंडने तो सामना जिंकून दोन गुण मिळवले खरे, मात्र त्यांचा नेट रनरेट अपेक्षेप्रमाणे वाढवता आला नाही. त्यानंतर वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागल्याने इंग्लंडची स्थिती आणखी डळमळीत झाली.

दरम्यान, इटली आणि नेपाळ यांच्यात झालेल्या सामन्यात इटलीने एकतर्फी खेळ करत 10 विकेट्स आणि तब्बल 44 चेंडू राखून विजय मिळवला. या विजयामुळे इटलीच्या खात्यात दोन महत्त्वाचे गुण जमा झालेच, शिवाय त्यांचा नेट रनरेटही लक्षणीयरीत्या सुधारला. परिणामी गुणतालिकेत इटलीने झेप घेतली आणि इंग्लंड थेट चौथ्या स्थानावर घसरले. क गटात आता कोणताही संघ पुढे सरकू शकतो, अशी चुरस निर्माण झाली आहे.

इंग्लंडसमोर आता ‘करो या मरो’ची परिस्थिती उभी राहिली आहे. उर्वरित दोन सामने इटली आणि स्कॉटलंडविरुद्ध असून दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकणे इंग्लंडसाठी अत्यावश्यक ठरणार आहे. यापैकी एकाही सामन्यात पराभव झाल्यास इंग्लंडला स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंवर प्रचंड दडपण आले आहे.


Protected Content

Play sound