वीरभूम, वृत्तसंस्था | पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यात एक अजब प्रकार घडला आहे. येथील सरकारी रुग्णालयात महिलेवर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून तब्बल दीड किलो वजनाचे दागिने आणि नाणी बाहेर काढण्यात आली आहेत. पोटात दुखू लागल्यानंतर या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेची मानसिक स्थिती ठिक नसल्याने ती दागिने व नाणी खात होती, असे स्पष्ट झाले आहे.
रामपूरहाट शासकीय रुग्णालयाचे शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख सिद्धार्थ बिस्वास यांनी याबाबत माहिती दिली. या महिलेच्या पोटात दुखत असल्याने अल्ट्रासाउंड तपासणी केली. त्यात तिच्या पोटात दागिने तसेच नाणी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लगेचच तिला शस्त्रक्रिया विभागात दाखल करून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेत तिच्या पोटात ५ व १० रुपयांची नाणी तसेच चेन, सोन्याच्या बांगड्या, पैंजण, कडा, घड्याळ, डुल, रिंग आढळून आहेत. याचे वजन दीड किलो इतके आहे. यातील काही दागिने सोन्याचे होते.
मारग्राममध्ये या महिलेचे घर आहे. घरातून दागिने व अन्य वस्तू गायब होत असल्याने कुटुंबीयांना संशय आला होता. मात्र याबाबत विचारल्यावर ती रडायची. तिचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. अलीकडे तर जेवण घेतल्यानंतर तिला उलट्या व्हायच्या, असे तिच्या आईने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून ती आजारी असल्याने खासगी डॉक्टरांकडे तपासणी केली मात्र तिच्या तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही. त्यामुळेच शासकीय रुग्णालयात जाण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. तिथे आठवडाभर तिची तपासणी करण्यात आली व नंतर शस्त्रक्रिया करण्यात आली.