सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा कृषी मंडळातील २०२४-२०२५ या वर्षातील केळी पिकविमा परतावा अद्याप न मिळाल्याने परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून न्यायासाठी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी रावेर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत तहसीलदार रावेर यांना निवेदन देत शासनाने तातडीने हक्काचा परतावा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सावदा कृषी मंडळातील सावदा, थोरगव्हाण, मागी, चुनवाडे, सुदगाव, रायपूर, गहुखेडा, रणगाव, तासखेडा, उदळी बुद्रुक, उदळी खुर्द, लुमखेडा आदी गावांतील केळी उत्पादक शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिना सुरू होऊनही पिकविमा परतावा मिळालेला नाही. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील बदलामुळे उत्पादनावर परिणाम झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला होता. मात्र, नुकसानभरपाईची रक्कम न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

यापूर्वीही शेतकऱ्यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. रावेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता, तसेच फैजपूर येथील प्रांत अधिकाऱ्यांनाही निवेदन सादर करण्यात आले होते. दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सावदा येथे रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अद्याप ठोस निर्णय किंवा परताव्याबाबत कार्यवाही झालेली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
पिकविमा परतावा न मिळाल्याने अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले असून काहींवर उपासमारीची वेळ आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. केळी हे प्रमुख नगदी पीक असल्याने त्यावरच संपूर्ण अर्थकारण अवलंबून आहे. विमा रक्कम न मिळाल्यास पुढील हंगामासाठी तयारी करणेही कठीण होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हक्काचा परतावा तातडीने मिळावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत सुमारे १६०० शेतकरी २३ फेब्रुवारी रोजी रावेर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनावर राजेंद्र कैलास चौधरी, रुपेश युवराज पाटील, मधुकर रघुनाथ पाटील, राजेंद्र पाटील आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.



